मनमाड : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या आणि रेल्वेचा प्रवास सामान्यांना सुलभ आणि सुकर करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे शुक्रवारी सायंकाळी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात अबूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्री आठ वाजेच्या सुमारास सुसज्जित वंदे भारत एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्थानकात येतात नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत एकच जल्लोष केला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार डॉ. भारती पवार व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते मनमाड रेल्वे स्थानकात मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
वंदे भारत एक्सप्रेस च्या स्वागतासाठी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानक अक्षरशा सजले होते. सर्वत्र व्यापक स्वच्छता करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व वंदे भारत या रेल्वेचे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल बॅनर संपूर्ण रेल्वे स्थानकात लावण्यात आले होते. भुसावळ विभागातील वरिष्ठ रेल्वेचे अधिकारी ,मनमाड शहरातील सर्व स्थरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुक्रवारी दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या गाडीचा शुभारंभ करण्यात आला.सर्व थरातील विविध मान्यवर आज पहिल्याच दिवशी या गाडीने प्रवास करत होते. वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हाय स्पीड रेल्वे असून या गाडीतून प्रवास करताना प्रवाशांना सुखद आणि आरामदायी प्रवासाचा आनंद मिळणार आहे.वंदे वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास म्हणजे विमान प्रवासाची सुखद अनुभूती असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांनी व्यक्त केली. सुसज्जा अत्याधुनिक डबे आरामदायी आसन व्यवस्था यामुळे या गाडीने अतिशय सुखकर असा प्रवास रेल्वे प्रवाशांना अनुभवता येणार आहे. गुरुवार वगळता आठवड्यातून इतर सर्व दिवस ही गाडी वंदे भारत एक्सप्रेस मुंबई - साईनगर शिर्डी - मुंबई अशी धावणार आहे.
मनमाड जंक्शन स्थानकात रात्री अबूतपूर्व जल्लोषात या गाडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ही गाडी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच सर्व राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था संघटनांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.मनमाड मधून देखील अनेक निमंत्रक मान्यवरांनी या गाडीतून शिर्डी प्रवाह पर्यंत प्रवास करून सुखद प्रवासाचा अनुभव घेतला.
# रेल्वेच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबई शिर्डी मुंबई हा प्रवास अवघ्या पाच तास वीस मिनिटात पूर्ण करणारी वंदे भारत ही ऐतिहासिक रेल्वे ठरली आहे देशात सुरू झालेली ही दहावी वंदे भारत एक्सप्रेस असून सीएसटीएम शिर्डी दरम्यान त्यातून जलद कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. एक्झिक्युटिव्ह क्लास पुश बॅक फीट आणि प्रत्येक डब्यात मिनी पॅन्ट्री हे या वंदे भारत एक्सप्रेसचे वैशिष्ट्य आहे. इगतपुरी ते कसारा घाटा दरम्यान बँकर इंजिन शिवाय ही गाडी धावणार आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र शिर्डी या दोन महत्त्वपूर्ण स्थानकांना जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस नागरिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरले आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस चे पहिले दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी रेल्वे स्थानकात नागरिकांनी ही मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
# सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत रेल्वे गाडीला एकूण १६ डब्बे असून ११२८ प्रवासी क्षमता आहे.पहिल्या दिवशी भुसावळ विभागाने ६०० सोव्हेनीर मोफत तिकिटे दिली होती . यामध्ये १५० सरकारी शाळेतील मुले, त्यांचे पालक आणि शिक्षक, १०० प्रसार माध्यम, १२५ आमदार, खासदार राजकिय मान्यवर, १२५ विविध मान्यवर जसे की डॉक्टर, इंजिनियर, उद्योग, रेल्वे ग्राहक आदि आणि १०० रेल्वे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .
# मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात या गाडीला केवळ तांत्रिक थांबा आहे. व्यावसायिक थांबा अद्याप दिलेल्या नाही. या रेल्वे स्थानकाचे जंक्शन महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने बंद भारत एक्सप्रेस ला मनमाड स्थानकात व्यावसायिक थांबा द्यावा अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.
Tags:
मनमाड