BHUMIPUTRA

१३ दिवसांआड पाणी वितरणाचे नगरपरीषदेकडून नियोजन


 

मनमाड :  सतत सुरू असलेला पाऊस,ओव्हरफ्लो झालेले वाघदर्डी धरण यामुळे ऐन दिवाळी सणाच्या वेळी तरी किमान आठ दिवसांआड पाणीपुरवठा होईल,या अपेक्षेत असणाऱ्या मनमाड शहरातील नागरिकांच्या तोंडाला नगरपरीषदेने ऐनवेळी पाने पुसली आहेत.
      सदोष, गलथान पाणी वितरण व्यवस्थेमुळे  निसर्गाने भरभरून पाण्याचे दान पदरात टाकले असले तरी घराघरातील पाण्याच्या घागरी मात्र ऐन दिवाळीच्या सणात रित्याच राहिल्याचे संतापजनक दृश्य शहरातील विविध भागासह नव वस्त्यातही पाहायला मिळत आहे१४ ते १५ दिवसांआड पाणी असा पालिकेचा खाक्या नको इतका पाऊस झाला असला तरी पूर्वीप्रमाणे सुरूच आहे. त्यामुळे या मानव निर्मित पाणी टंचाईचा सामना करीतच घरोघरचा महिला वर्ग सध्या त्रस्त आहे.
      शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण पूर्णत: भरलेले आहे. परंतू वारंवार खंडीत होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील पाणी वितरणाचे फेर नियोजन करण्यात आले असून सद्य स्थितीत कॅम्प विभागात पाणी वितरण सुरू करण्यात आलेले आहे. तर उर्वरित भागात पुढील आवर्तनानुसार साधारणत:  १३ व्या दिवशी पाणी वितरण सुरू राहिल. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मनमाड नगरपालिका प्रशासनाने  आज अधिकृत प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
     अचानक झालेल्या पावसामुळे व जुन्या पाईप लाईन लिकेज मुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले  आहे.शहरातील विविध आठ  ठिकाणी असलेल्या जलकुंभाना वाघदर्डी जलशुध्दीकरण केंद्रामार्फत होणाऱ्या पुरावठ्यात सातत्याने व्यत्यय येत आहे विजपुरवठा खंडीत होत आहे.
     यामध्ये शहरातील जवळपास बरेचसे भाग प्रभावित झालेले असल्याने शहराला नियोजित करण्यात येणारा १४ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा हा  १८ ते १९ दिवसांआडवर गेलेला होता.
    महावितरण कंपनीकडून सद्य स्थितीत वीजपुरवठा पुर्ववत झाल्याचे समजते. त्यानुसार नगरपरिषद प्रशासनाकडून शहरातील पाणी वितरणाचे आता फेर नियोजन करण्यात आले असून यापुढे आवर्तनानुसार साधारणत:  १३ व्या दिवशी पाणी वितरण सुरू राहिल . या दरम्यान महावितरण कडून वीजपुरवठा खंडीत झाल्यास अथवा जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत उपकरणात तांत्रिक बिघाड अथवा मुख्य जलवाहिनी लिकेज झाल्यास त्याचा परिणाम पाण्याच्या वितरणावर होण्याची टांगती तलवार कायम आहे. 

# चौकट :
         शक्यतो नियोजीत वेळेनुसार पाणी वितरण सुरू ठेवण्यासाठी नगरपरीषद प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील, नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच प्यावे, पाण्याचा अपव्यय करू नये, पाणी गळती वेळीच थांबवावी ,असे आवाहन नगरपरीषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सचिनकुमार पटेल व पाणीपुरवठा अभियंता अमृत काजवे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने
BHUMIPUTRA